शेतातील सोलर पंप, वायर-मोटर चोरीनंतर आता हॉटेलही निशाण्यावर; व्यापारी वर्गात भीती, पोलिसांसमोर सुरक्षेचे आव्हान
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. पाचोड येथील जय भवानी बिअर बार हॉटेलचा पाठीमागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारूचा साठा, किराणा साहित्य, इन्व्हर्टर आणि होम थिएटर असा एकूण 36 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पाचोड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंप, वायर आणि मोटार चोरीच्या घटनांमुळे हा परिसर आधीच चर्चेत असताना आता हॉटेलमध्ये झालेल्या चोरीमुळे शेतकरी, नागरिक तसेच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाचोड येथील राष्ट्रीय महामार्गावर जय भवानी बिअर बार हॉटेल आहे. हॉटेलचे मालक प्रतीक अंबादास नरोडे हे नेहमीप्रमाणे बुधवारी दिवसभराचा व्यवसाय आटोपून रात्री हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी विक्रीसाठी ठेवलेला विदेशी दारूचा साठा तसेच किचन रूममधील किराणा साहित्य, इन्व्हर्टर आणि होम थिएटर चोरी करून पोबारा केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी हॉटेल मालक प्रतीक नरोडे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चोरीमध्ये 36 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.

No Comment! Be the first one.