सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आरोग्य शिबिराचाही लाभ
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : जळगाव मार्गावरील सिडको परिसरातील श्री रेणुकामाता सुवर्ण मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असून, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत सेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ललिता पंचमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली. भगिनींनी जगदंबेची ओटी भरून दर्शन घेतले. रात्री शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्या लोकसंगीत समूहाने कार्यक्रमात रंगत आणली. यापूर्वी श्रीकृष्ण गोसावी आणि सुधीर बहिरगावकर यांच्या गायनानेही श्रोत्यांची मने जिंकली.
सायंकाळच्या आरतीला कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार विलास भुमरे, आमदार अनुराधाताई चव्हाण, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, माजी महापौर सुदाम सोनवणे, किशोर नागरे, विजय औताडे आदी उपस्थित होते. विश्वस्त अध्यक्ष सतीश वैद्य यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोफत आरोग्य शिबिर, औषधवाटप तसेच महिलांसाठी सवलतीच्या दरात एमसीएमएलई कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेडगेवार रुग्णालय आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्यसेवा दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्काळ दर्शनाची सुविधा आणि दिव्यांग व गरजू भाविकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणी सदस्यांच्या नियोजनातून मंदिरात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

No Comment! Be the first one.