पत्नी घरी परतल्यानंतर घटना उघड; उपचारापूर्वीच डॉक्टरांनी केले मृत घोषित
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : गंगापूर शहरातील माऊली नगर परिसरात एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. नारायण हरिकिसन लाहाणे (वय ३२, मूळ रा. वाकोद, ता. फुलंब्री, हल्ली मुक्काम माऊली नगर, गंगापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण लाहाणे हे गंगापूर शहरातील माऊली नगर येथे विजय साबणे यांच्या घरात भाड्याने राहत होते. ते जामगाव रोडवरील पंचगंगा सीड्स कंपनीत कामाला होते, तर त्यांची पत्नी शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. हे दाम्पत्य आपल्या चार वर्षांच्या मुलीसह येथे राहत होते.
२८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेदरम्यान नारायण यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी कामावरून घरी परतली. तिने दरवाजा ठोठावला तसेच अनेक वेळा फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही आणि काही वेळाने फोनही बंद झाला.
यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पत्नीने रात्री १२ वाजता गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बाप्ते, अनिरुद्ध शिंदे, सर्पमित्र गणेश साळुंके, संदीप महेरे व इतर नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी नारायण हे छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
उपस्थितांनी त्यांना खाली उतरवून तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव पुढील तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.