कायगाव टोका येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार; गंगापूर पोलिसांकडून हवेत फैरी झाडून मानवंदना
विजय बनसोड लोकार्थ प्रतिनिधी
गंगापूर : येवला–वैजापूर रस्त्यावरील नांदगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या अमळनेर येथील सशस्त्र सेना दलाचे जवान सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय ३२) यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास खामगाव टोका येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गंगापूर पोलिसांनी हवेत फैरी झाडून वीर जवानाला मानवंदना दिली, तर माजी सैनिकांनी श्रद्धांजली अर्पण करून त्यांना अखेरचा सलाम केला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
सोमनाथ जाधव हे सुट्टी संपवून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकाकडे निघाले होते. सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास येवला–वैजापूर मार्गावरील नांदगाव फाट्याजवळ पुलावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी ट्रकखाली गेल्याने सोमनाथ जाधव आणि त्यांना मनमाडला सोडण्यासाठी सोबत निघालेले हिरामण गिरीजाराम माळी (वय ४३, रा. वडगाव, ता. गंगापूर) या दोघांचा मृत्यू झाला. दोघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आईच्या कष्टातून घडला देशसेवक
सोमनाथ जाधव यांचा जीवनप्रवास संघर्षमय होता. अमळनेर येथील आदिवासी समाजातून सैन्यात भरती होणारे ते पहिले युवक होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवेचा मार्ग स्वीकारला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांना शिकवले आणि सैन्यात भरती होण्याचे स्वप्न साकार केले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सैन्यात स्थान मिळवले होते. ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही परिचित होते.
सोमनाथ हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे. मुलाने देशसेवेचा मार्ग निवडून कुटुंबाचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला; मात्र नियतीच्या क्रूर घावाने त्यांचा अकाली अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमळनेर गावावर शोककळा
कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याने अमळनेर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी गंगापूर पोलिसांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही सोमनाथ जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कष्टाने पुढे आलेल्या या जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे मन हेलावून गेले.
No Comment! Be the first one.