जायकवाडीच्या तीन आवर्तनांसाठी प्रयत्नशील; ब्लू सफायरच्या चतुर्थ गाळप हंगामाचा शुभारंभ
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे
घनसावंगी : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाढीव तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच शेती आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी डाव्या कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी घोषणा आमदार हिकमत उढाण यांनी केली. कंडारी येथील ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा. लि.च्या सन २०२६-२७ या चौथ्या ऊस गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
पावसाने ओढ दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली असून वजनातही घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वेळेत ऊसतोडणी आणि गाळप होणे आवश्यक आहे. यासाठी कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोडणी टोळ्या आणि हार्वेस्टिंग मशीनची उपलब्धता करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे उढाण यांनी सांगितले.
ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा. लि.च्या चतुर्थ ऊस गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम डॉ. राजन उढाण व डॉ. मंजुषा राजन उढाण यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आमदार हिकमत उढाण, सौ. मायाताई उढाण, अजित उढाण, दिलीप उढाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर शाम प्रल्हाद केरुरकर व सविता शाम केरुरकर यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधी बळीराम बापूराव पवार, मदन आसाराम जाधव, श्रीरंग रघुजी आधुडे, वैभव विठ्ठल लाड आणि भीमराव शामराव ढाकणे यांच्या हस्ते मोळी गव्हाणीत टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
दसऱ्याला वाढीव तिसरा हप्ता
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असताना शेतीचा खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाढीव तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आमदार उढाण यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कारखाना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जायकवाडीच्या तीन आवर्तनांसाठी प्रयत्न
घनसावंगी तालुक्यातील विहिरी, बोअरवेल आणि जलसाठ्यांमधील पाणी कमी होत असल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी डाव्या कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आवर्तनांचे नियोजन आणि तारखा निश्चित करण्यासाठी संबंधित स्तरावर प्रयत्न केले जातील. कालव्याच्या पाण्यामुळे शेती आणि पशुधनाला दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याचे उढाण यांनी सांगितले.
२०२८ पर्यंत दुसरे युनिट सुरू करण्याचे उद्दिष्ट
ब्लू सफायर कारखान्याच्या विस्ताराची माहिती देताना आमदार उढाण यांनी लवकरच दुसऱ्या युनिटच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. सन २०२८ पर्यंत या युनिटमधून ऊस गाळप सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. दुसरे युनिट कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळपासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी जावा आणि उभ्या उसाचे नुकसान टाळता यावे, यावर भर दिला जाणार आहे.
नफा नव्हे, शेतकऱ्यांना न्याय देणे हे ध्येय
कारखाना सुरू करण्यामागील उद्देश केवळ नफा कमावणे नसून शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळवून देणे हा आहे, असे उढाण यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या एकूण खर्चापैकी सुमारे ९२ टक्के खर्च शेतकऱ्यांशी संबंधित बाबींवर, तर उर्वरित आठ टक्के खर्च कामगार आणि इतर बाबींवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्लू सफायर कारखान्यात गूळ पावडर या उत्पादनाची निर्मिती केली जाते. या उत्पादनाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे परिसरातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपणे आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देणे हेच कारखान्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि घटत्या ऊस उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत असताना वाढीव तिसऱ्या हप्त्याची घोषणा आणि जायकवाडीच्या तीन आवर्तनांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, विविध पदाधिकारी, मान्यवर तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.