एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन; एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे घनसावंगी
पाण्याची उपलब्धता, वाढता उत्पादन खर्च आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे ऊस शेतीचे अर्थकारण सांभाळण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाणी आणि कमी खतांत अधिक उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. ठिबक सिंचनाचा वापर करावा, उसाचे पाचट जाळण्याऐवजी जमिनीत कुजवावे आणि वसंत ऊर्जेचा वापर करावा, असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले. शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील आरगडे गव्हाण येथील प्रगतिशील शेतकरी रंजित शंकरराव गुजर यांच्या शेतात रविवारी (ता. ११) स्व. कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त ‘आठवणी साहेबांच्या’ आणि ‘आधुनिक तंत्रज्ञान व एआयच्या मदतीने शेतीचे नवे पर्व’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ऊसतोडणीच्या शुभारंभप्रसंगी राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ऊस शेतीत उत्पादन वाढविताना खर्चावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाणी आणि खतांचे योग्य नियोजन करावे. एकरी १०० मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीने शेतीचे व्यवस्थापन करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
कृषी विज्ञान केंद्राचे एआय प्रकल्पप्रमुख तुषार जाधव यांनी कमी पाण्यात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगितले. सध्या सुमारे पाच हजार शेतकरी या तंत्रज्ञानाचा लाभ घेत असून, आगामी काळात ही संख्या दहा हजारांपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्हीएसआयचे समाधान सुरवसे यांनी जमिनीची क्षमता लक्षात घेऊन खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला. गरजेपेक्षा अधिक रासायनिक खते आणि पाणी दिल्याने उत्पादन वाढेलच असे नाही. त्यामुळे जमिनीचा पोत, पिकाची गरज आणि उपलब्ध पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन खत व पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात ठिबक सिंचन, पाणी व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. उसाचे पाचट जाळण्याऐवजी शेतातच कुजविल्यास जमिनीतील सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनवाढीसोबत जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.
ऊसतोड मजुरांनाही मदतीचा हात
कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त प्रगतिशील शेतकरी रंजित शंकरराव गुजर यांनी ऊसतोड मजुरांना पाणी थर्मासचे वाटप केले. ऊसतोडणीच्या कामादरम्यान मजुरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या दैनंदिन गरजेला मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शेतीच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या कष्टकरी ऊसतोड मजुरांप्रती आपुलकी व्यक्त करीत गुजर यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, कार्यकारी संचालक आर. एस. समुद्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार देशमुख, बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब चिमणे, माजी सभापती सुदामराव शिंदे, उपसभापती मीराबाई वराडे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्राचार्य डॉ. राम काकडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
No Comment! Be the first one.