१६ ते १९ आक्टोबर रोजी होणार्य युवक महोत्सवात सिने अभिनेते भारत गणेशपुरे यांचीही उपस्थिती
लोकार्थ प्रतिनिधी भारत गणेशपुरे
नांदेड – मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून अनावश्यक खर्चाला फाटा देत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे भान जपत आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव साजरा करावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे. त्यानुसार, विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ हा १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सायन्स कॉलेज, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महोत्सवात कोणताही अनावश्यक झगमगाट करू नये, तसेच शॉल, पुष्पगुच्छ आदींवर खर्च टाळावा, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, स्थानिक परीक्षक आणि सहाय्यकांना देण्यात येणाऱ्या मानधनातील काही रक्कम संबंधित मान्यवरांनी स्वेच्छेने परत करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सांस्कृतिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’चे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी मुख्य मंचावर संपन्न होणार असून यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांची उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन समारंभ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील, प्रमुख पाहुणे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, मराठी सिने अभिनेते भारत गणेशपुरे, नरेंद्र दादा चव्हाण, अॅड. प्रदीप नागपूरकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
समारोप व बक्षीस वितारण समारंभ १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ज्ञ वाजता साने गुरुजी मुख्य मंचावर संपन्न होणार आहे. यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल अग्रवाल, सचिव सौ. शामल पत्की यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवाचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे निमंत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, युवक महोत्सवाचे सचिव डॉ. प्रशांत सुतकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

No Comment! Be the first one.