रात्री कुटुंबीयांसोबत झोपलेली मुलगी मध्यरात्री गायब; गंगापूर पोलिसांत आईची धाव
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोडे गंगापूर
गंगापूर तालुक्यातील सुरेवाडी-बाबरगाव शिवारातील शेतवस्तीवरून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवानी हिराचंद लखवाळ असे या तरुणीचे नाव असून, अज्ञात व्यक्तीने तिला अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी ही बारावी उत्तीर्ण असून सध्या घरीच राहत होती. तिच्या विवाहासाठी १५ ऑक्टोबर रोजी पाहुणे येणार असल्याने तिची बहीण गीता बैनाडे या घरी आल्या होत्या. १३ ऑक्टोबर रोजी रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास शिवानी आई, वडील, भाऊ आणि मावशीसोबत घरातील एकाच खोलीत झोपली होती.
रात्री साडेअकराच्या सुमारास शिवानीची आई विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी उठली असता, तिला शेजारी झोपलेली शिवानी दिसली नाही. घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतरही ती आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाइकांकडेही तिचा शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.
अखेर शिवानीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने शिवानीला शेतातील राहत्या घरातून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तरुणीचे वर्णन
शिवानीचे वय १९ वर्षे, उंची सुमारे पाच फूट दोन इंच, रंग गोरा आणि शरीरयष्टी मध्यम-सडपातळ आहे. तिचे केस काळे असून वेणी घातलेली होती. बेपत्ता होताना तिने लाल रंगाचा फुल टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. तिला मराठी व हिंदी भाषा येतात. तिच्याकडे मोबाईल फोन नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलीचे अपहरण केले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ फरताडे हे करीत आहेत.
No Comment! Be the first one.