दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी; मंत्री, खासदार आणि आमदारांना गावबंदीचा इशारा*
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण
राज्यात अपुऱ्या पावसामुळे आणि तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत पैठणमध्ये शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले.
गुरुवारी पैठण येथील तहसील कार्यालयात छावा क्रांतिवीर सेना, छावा संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याचे सांगत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मदत न मिळाल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदीचा इशारा
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर मंत्री, खासदार आणि आमदारांना गावात फिरकू देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला. दुष्काळामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, ज्ञानदेव मुळे, रामेश्वर बावणे, सुभाष नवथर आणि भगवान सोरमारे यांनी नायब तहसीलदार कैलास बहुरे यांच्याकडे सादर केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीऐवजी भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी पैठणमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त झाला.
No Comment! Be the first one.