हजारो भाविकांचा सहभाग
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद – गोविंदा गोविंदा चा जयघोष, डोळ्यांना लागलेली बालाजी दर्शनाची आस अन् चेहर्यावर ओसंडून वाहणारा भक्तिभाव अशा चैतन्यमय वातावरणात प्रति तिरूपती म्हणून प्रसिद्ध असलेले म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर येथे श्री व्यंकटेश प्रतिष्ठान तर्फे वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असल्याची माहिती श्री व्यंकटेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र गादिया यांनी दिली.
ब्रह्मोत्सवानिमित्त ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अंकुरापर्ण पूजा करण्यात आली. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहण पार पडले. १९ ऑक्टोबर रोजी श्री गिरीजादेवी मंदिरापर्यंत दुपारी तीन वाजता रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा वाजता उत्सव मूर्ती अभिषेक, शोभायात्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १६ ऑक्टोंबर रोजी महाअभिषेक मुख्य मूर्ती पूजा सकाळी सात वाजता करण्यात आली. १७ ऑक्टोंबर रोजी कल्याण उत्सव पूजा दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त सकाळी दहा वाजता ध्वजारोहण. दुपारी साडेबारा वाजता चक्र स्नान आणि दुपारी साडेतीन वाजता महा पूर्णाहुती दिली जाणार असून ११ ते २० ऑक्टोबर या दरम्यान दररोज महाप्रसाद दुपारी बारा ते तीन यावेळी असणार आहे.
म्हैसमाळ येथे ब्रह्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री व्यंकटेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र गादिया, नितीन गादिया, शिरीष गादिया यांच्यासह प्रमुख आचार्य वेदशास्त्रसंपन्न धनंजय नाईक, विशाल जोशी, अवधेश द्विवेदी, कस्तुरी वेंकटा राधेसाई आदी परिश्रम घेत आहेत.
श्री व्यंकटेश प्रतिष्ठानच्या वतीने नित्य सेवा, अन्नदान, यज्ञ, कल्याण उत्सव, वस्त्र सेवा, गोशाळा, मंदिर परिसर विकास कामे देखील सुरू असल्याचे श्री व्यंकटेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र गादिया, नितीन गादिया, शिरीष गादिया यांनी सांगितले.

No Comment! Be the first one.