तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे, केज
केज तालुक्यातील नायगाव येथे महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे नायगाव येथील महारुद्र सखाहरी गुजर, नितीन श्रीहरी गुजर आणि सचिन नवनाथ गुजर या तीन शेतकऱ्यांचा जवळपास ६ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत ऊस पिकासह ठिबक संचाचेही मोठे नुकसान झाले असून, आधीच दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
केज तालुक्यातील नायगाव येथे दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास विजेच्या खांबावर लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांचे एकमेकांना घर्षण होऊन ठिणगी पडल्याने महारुद्र सखाहरी गुजर, नितीन श्रीहरी गुजर आणि सचिन नवनाथ गुजर या तीन शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. तसेच ऊसातील ठिबक संच देखील जळून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाईची मागणी :- संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी ज्या तीन शेतकऱ्यांचा ऊस महावितरण कंपनीच्या गलथानपणामुळे आगीच्या भक्षस्थानी पडला त्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

No Comment! Be the first one.