शेतकरी आत्महत्येला आठवडा उलटूनही मदतीची प्रतीक्षा; प्रशासनाच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
लोकार्थ रिपोर्ट | चंद्रकांत आंबिलवाले | दि. २८, पैठण
पैठण : पैठण तालुक्यातील कडेठाण येथे दुष्काळसदृश परिस्थिती, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त असलेल्या ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेला आठवडा उलटूनही संबंधित कुटुंबाला शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नसल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. संकटात सापडलेल्या या कुटुंबाची शासनाने तातडीने दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कडेठाण येथील शंकर चंद्रकांत तवार (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने गुरुवार, दि. २२ रोजी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने तसेच कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे ते त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर शेतकरी कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, घटनेला आठवडा उलटूनही मदतीबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने कुटुंबीयांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात तलाठी श्रीकांत गीते यांनी आवश्यक अहवाल व कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची योग्य चौकशी करून शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कडेठाणचे सरपंच भूषण भारत तवार, तसेच कुटुंबातील सदस्य गोवर्धन तवार आणि विनोद तवार यांनी आमदार विलास बापू भुमरे आणि तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे केली आहे.
आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला आता शासकीय मदतीचा आधार कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन या मागणीची दखल घेऊन किती लवकर कार्यवाही करते, याकडे कडेठाण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.