१४१ गांजाची झाडे हस्तगत; १०५ किलो गांजा जप्त, ६६ वर्षीय आरोपीला अटक
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव
पिशोर : पोलीस ठाणे पिशोरच्या हद्दीतील लालवण येथील पाडळी एकफाटा शिवारात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गांजा लागवडीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. २८ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या धडक कारवाईत तब्बल १४१ गांजाची झाडे, एकूण १०५.१५ किलो वजनाचा मुद्देमाल आणि ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ६६ वर्षीय शेतकरी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे (रा. लालवण, ता. फुलंब्री) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना लालवण येथील गट क्रमांक २८ मधील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेतावर छापा टाकला असता, गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पंचांसमक्ष झाडांची मोजणी करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याचा आरोप आरोपीवर आहे. या प्रकरणी अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांच्या उपस्थितीत, सपोनि कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक, कृषी विभागाचे कर्मचारी, होमगार्ड आणि कन्नड येथील फॉरेन्सिक पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
बेकायदेशीर अमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पिशोर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या लागवडीमागे आणखी काही बाबी आहेत का, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

No Comment! Be the first one.