उस्मानपुऱ्यातील उच्चशिक्षित मुग्धा देशमुखच्या मृत्यूने खळबळ; वडिलांनी दिली होती अपहरणाची तक्रार, मृत्यूचे गूढ कायम
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेणारी आणि कुटुंबीयांशी नियमित संपर्कात असलेली उस्मानपुऱ्यातील दशमेशनगरची ३४ वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख हिचा पिंपरी-चिंचवड येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मुग्धा लंडनमध्ये असल्याचे कुटुंबीयांना भासवत होती; मात्र ती ऑगस्टपासूनच भारतात परतली होती. मुलीचा संपर्क तुटल्याने वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. पोलिसांनी बँक व्यवहारांच्या तांत्रिक तपासातून तिचा ठावठिकाणा शोधला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. तिचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याचे गूढ अद्याप कायम आहे.
मुग्धाचे वडील अविनाश देशमुख हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शहर अभियंता म्हणून कार्यरत होते. सध्या ते छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणात सेवाकरार पद्धतीने काम करतात. मुग्धा जुलै २०२५ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तेथे राहून ती पार्टटाइम कामही करत होती. आई-वडिलांशी तिचा नियमित फोन आणि मेसेजद्वारे संपर्क होता.
लंडनमध्ये असल्याचे भासवले!
पोलिसांच्या माहितीनुसार, मुग्धा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच लंडन सोडून भारतात परतली होती. पिंपरी-चिंचवड येथे स्वतःच्या नावावर भाड्याने फ्लॅट घेऊन ती राहत होती. १ सप्टेंबरपासून या फ्लॅटमध्ये राहून ती एमबीएच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस घेत होती. मात्र, कुटुंबीयांशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधताना आपण अजूनही लंडनमध्येच असल्याचे ती भासवत होती.
ऑनलाइन व्यवहारांनी उलगडले गूढ!
२३ ऑक्टोबरला आईशी बोलल्यानंतर २४ ऑक्टोबरपासून मुग्धाचा संपर्क पूर्णपणे तुटला. तिचा मोबाइलही बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. लंडनमधील मैत्रिणीशी संपर्क साधल्यानंतर तेथील पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली. तपासात मुग्धा ऑगस्टमध्येच लंडन सोडून गेल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, वडिलांनी तिच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले असता झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, बुक माय शो, मेक माय ट्रिप आणि व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेससारख्या सेवांशी संबंधित व्यवहार भारतात झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुग्धा भारतातच असल्याचा संशय बळावला. तिच्या वडिलांनी २७ ऑक्टोबरला उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
फ्लॅट उघडताच धक्कादायक दृश्य!
तक्रारीनंतर उस्मानपुरा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. ऑनलाइन व्यवहारांचा माग काढत पोलीस मुग्धाच्या वडिलांसह पिंपरी-चिंचवड येथील फ्लॅटवर पोहोचले. दरवाजा उघडून पाहणी केली असता मुग्धाचा मृतदेह फुगलेल्या आणि अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाजवळ काही औषधांच्या गोळ्या, मोबाइल आणि इतर साहित्य मिळाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
आत्महत्या की हत्या? तपासाकडे लक्ष
उच्चशिक्षित तरुणीने कुटुंबीयांपासून वास्तव लपवून पुण्यात वास्तव्य का केले, तिचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला, यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
No Comment! Be the first one.