लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरु
कन्नड-सोयगाव तालुक्यातील नागरिक संपूर्ण शेती व्यवसायावर अवलंबून असून, शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून अनेकांच्या जमिनी धरणात गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबियांना पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.मात्र कन्नड-सोयगाव तालुक्यातील धरणांचे पाणी अन्यत्र वळविण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हक्काच्या पाण्याबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून केले आहे.करंजखेडा भागातील नेवपूर धरणातील पाणी पाईपलाईनद्वारे सिल्लोडला नेण्याच्या विषयावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तयार केलेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने राजपूत यांनी आपली भूमिका मांडली.ते म्हणाले की, गौताळा अभयारण्य परिसरातील नदीच्या उगमातून वाहणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास मतदारसंघातील खेडी, वाकोद, चिंचोली आणि करंजखेडा परिसरात भविष्यात मोठे बॅरेज उभारण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आमदार असताना मोठ्या नद्यांवर बॅरेज उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातून जानेवारी २०२४ मध्ये वाकोद गावाच्या वरच्या बाजूला एक आणि दिगाव-खेडी गावांच्या दरम्यान दुसरे, असे दोन बॅरेज मंजूर झाले होते. या दोन्ही कामांचे टेंडरही झाले असून तांत्रिक अडचणींमुळे अद्याप टेंडर ओपन झालेले नसल्याचे सांगितले
मतदारसंघातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पाणी अन्यत्र वळविण्याबाबत निर्णय घेताना स्थानिक शेती, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील जलसाठ्याच्या संधी यांचा विचार व्हावा.नागरिकांचा हक्क हिरावला जात असेल तर तालुक्यातील जनतेच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारू, यासाठी सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटना यांचा पाठिंबा घेऊन तालुक्यातील जनतेला मदत करण्यासाठी तत्पर राहण्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले….
व्हिडिओ:- माजी आमदार उदयसिंह राजपुत (कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ)
No Comment! Be the first one.