लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा अनुभवी काँग्रेस नेते डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी २०२९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला आणि पक्षविस्ताराला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम करत त्यांनी संघटनात्मक कार्याचा अनुभव संपादन केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, संघटनात्मक कौशल्याचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काचा फायदा आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला होणार आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि आगामी निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत पक्षविस्तारासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
No Comment! Be the first one.