अर्धवट कामामुळे वाहनधारकांची दमछाक; अपघाताचा धोका वाढला, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लोकार्थ प्रतिनिधी माधव वागलगावे चाकूर
देवणी : तालुक्यातील येनगेवाडी ते अंबानगर हा महत्त्वाचा मार्ग सध्या खड्ड्यांमुळे चर्चेत आला आहे. विकासाच्या गप्पा आणि रस्त्याच्या प्रत्यक्ष स्थितीतील तफावत या मार्गावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था कायम असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गाच्या सुधारणा कामाला मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, काम सुरू होऊनही ते पूर्णत्वास गेले नाही. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल
येनगेवाडी आणि अंबानगर परिसरातील अनेक विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच नागरिक दररोज याच मार्गाचा वापर करतात. खराब रस्त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागत असून वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह
रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन बराच कालावधी लोटला, तरी उर्वरित काम पूर्ण झालेले नाही. संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट का ठेवले, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या या रस्त्याची तातडीने पाहणी करून उर्वरित काम पूर्ण करावे. रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीस योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा ग्रामस्थांच्या नाराजीला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आता तरी संबंधित विभागाला जाग येणार का आणि येनगेवाडी-अंबानगर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
No Comment! Be the first one.