भररस्त्यात एकमेकांवर फटाके फोडत नागरिकांच्या जीवाशी खेळ
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : सार्वजनिक रस्त्यावरून नागरिकांची आणि वाहनांची सतत वर्दळ सुरू असताना त्याच रस्त्यावर एकमेकांविरुद्ध फटाके फोडण्याचा धक्कादायक प्रकार जुने कायगाव येथील चौकात घडला. रात्रीच्या सुमारास भररस्त्यात फटाके फोडणाऱ्या चौघांनी वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला. या प्रकाराची दखल घेत गंगापूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५, २७० आणि २९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुने कायगाव रोडवरील चौकात हा प्रकार घडला. कदिर अकबर शेख, प्रतीक बाळू चिते, प्रसाद नामदेव गायकवाड आणि रोहित बाळासाहेब भोगे (सर्व रा. जुने कायगाव, ता. गंगापूर) यांनी सार्वजनिक रहदारी सुरू असताना रस्त्यावर एकमेकांविरुद्ध फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी विठ्ठल भाऊसाहेब जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४६ वाजता गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी विठ्ठल जाधव करीत आहेत.
सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असताना तेथेच फटाक्यांची आतषबाजी करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. सण-उत्सव साजरे करताना इतरांच्या सुरक्षिततेचे भान राखणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

No Comment! Be the first one.