लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल जवळा बाजार
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून विविध कौशल्यांचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, स्वावलंबन आणि उद्योजकतेची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळा, जवळा बाजार येथे मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (MSFC) लॅब उभारण्यात आली आहे. विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या तांत्रिक सहकार्याने आणि JNK इंडिया लिमिटेड यांच्या CSR निधीतून साकारलेल्या या कौशल्य विकास प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या प्रयोगशाळेचे उद्घाटन JNK इंडिया लिमिटेडचे CEO श्री. दीपकजी भारुका यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. नानासाहेब कदम (मंत्रालय, मुंबई), इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे हिंगोली येथील सहाय्यक संचालक श्री. ज्ञानेश्वर काकडे तसेच दुर्गा हॉस्पिटल, जवळा बाजारचे डॉ. राजकुमारजी भारुका उपस्थित राहणार आहेत.
या मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा व पर्यावरण, शेती, अभियांत्रिकी, विद्युत उपकरणे, वेल्डिंग, विविध तांत्रिक कामे आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्त कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक साधनसामग्रीचा वापर करून समस्या सोडविणे, वस्तू तयार करणे, दुरुस्ती करणे आणि कामातून शिकणे अशा अनुभवाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.
या उपक्रमामुळे ग्रामीण व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत रोजगाराभिमुख आणि जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी शिवनेरी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय परिहार, शिवनेरी माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक *श्री. बळवंतराव चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा बाजारचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. कैलास लाहोटी यांनी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.



No Comment! Be the first one.