फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद अन् म्हशी पळविण्याचा थरार; यात्रा मैदानावर नागरिकांची मोठी गर्दी.
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे, पैठण
ऐतिहासिक पैठण शहरात भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक म्हशींचा सगर उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज मंदिरासमोरील यात्रा मैदानावर या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विविध रंगांनी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या म्हशी आणि रेड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील गवळी समाज बांधवांसह पशुपालकांनी आपल्या लाडक्या म्हशी व रेड्यांसह या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
म्हशी पळविण्याचा पारंपरिक थरार अनुभवण्यासाठी यात्रा मैदानावर नागरिक, तरुण आणि पशुप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या उत्सवाच्या माध्यमातून पैठण शहरातील जुन्या रूढी-परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. आधुनिकतेच्या काळातही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा उत्साहाने जपली जात असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शुभम सोमनाथ परळकर, माजी नगरसेवक सोमनाथ परळकर, अजय परळकर, दत्तू खताडे, छगन काटकर, महेश खताडे, सचिन परळकर, मारुती निस्ताने, विठ्ठल काटकर, सुरेश औरंगे, दीपक वरकड, लिंगप्पा डोळझापे, प्रशांत खताडे, विजू धनगर, किशोर डोळझापे, अनिल हातघुले, सिदप्पा काटकर, गिरजाप्पा परळकर तसेच अंबड येथील आप्पा परळकर यांनी केले होते.
No Comment! Be the first one.