लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार
अंबड – मराठी साहित्याच्या माध्यमातून संविधान, कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याच्या उद्देशाने अंबड येथे येत्या ५ व ६ डिसेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘विधी व न्याय मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संजय खोरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि यशवंत प्रतिष्ठान, शेवगा, ता. अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभिनव संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, शिक्षण, पर्यावरण, कृषी आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्य केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागील सोळा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने नियमितपणे सामाजिक प्रबोधनपर ‘यशवंत व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नामवंत वक्त्यांनी आपले विचार मांडले आहेत.
‘सुपर थर्टी’चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार यांच्या गौरवार्थ यशवंत प्रतिष्ठानतर्फे ‘आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन’ हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केला जातो. तसेच समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या मराठवाड्यातील व्यक्ती आणि संस्थांना ‘यशवंत पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशवंत प्रतिष्ठान समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. याच वैचारिक बांधिलकीतून कायद्याची भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रतिष्ठानने आता या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात विधिज्ञ, न्यायाधीश, साहित्यिक, पत्रकार, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे हे मराठवाड्याच्या भूमीत शिक्षण घेऊन उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले व्यासंगी, निःस्पृह आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी केलेले न्यायदान सामाजिक भान जपणारे ठरले आहे. संविधानावरील त्यांची गाढ निष्ठा आणि न्यायव्यवस्थेतील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड संमेलनाला मोठी वैचारिक उंची प्रदान करणारी ठरणार आहे.
५ व ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडी आणि संविधान जागर दिंडीने होणार आहे. या दोन दिवसीय संमेलनात कायदा आणि साहित्य, सामाजिक न्याय तसेच मराठी भाषेतील कायदेविषयक साहित्य अशा विविध विषयांवर परिसंवाद, अभ्यासपूर्ण व्याख्याने, काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून, सर्वसामान्य नागरिक, साहित्यिक, विधिज्ञ आणि अभ्यासकांनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. संजय खोरे यांनी केले आहे.
यावेळी स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी धुपे, प्राचार्य विश्वास कदम, राजेश भापकर, संतोष मोटे, अरुण ठेंग आणि रमेश मायंदे यांची उपस्थिती होती.
No Comment! Be the first one.