लोकार्थ मीडिया
राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू असताना आता भाजपच्या नेत्यांनी या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदांची मालिकाच सुरू केली आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी, ममता बॅनर्जी, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अभिजित दिपके, नेहा बोरा तर दुसरीकडे भाजपचे नेते अमित शहा, पियूष गोयल, राजनाथ सिंह, सुधांशु त्रिवेदी, संबित पात्रा देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांची जुगलबंदी सुरू झाली आहे. अशातच कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनाबाबत भाजपाचे नेते बृजभूषण शरण सिंह यांनी एक गंभीर आरोप केला आहे. या आंदोलनामागे उद्योगपती एलॉन मस्क यांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप बृजभूषण शरण सिंह यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, “ही संपूर्ण चळवळ त्यांच्या (एलॉन मस्क यांच्या) सांगण्यावरून घडवून आणली जात आहे. हे आपल्या राष्ट्राविरुद्धचं एक मोठं षड्यंत्र आहे. आपल्या देशाची तुलना बांगलादेश आणि पाकिस्तानशी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाला धमकावण्याच्या उद्देशाने मोर्चा काढला जात आहे, असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही. हे परकीय लोक जे आपल्या देशात व्यवसाय करू इच्छितात तेही स्वतःच्या अटींवर तेच लोक या चळवळीला (सीजेपी) खतपाणी घालत आहेत”, असा गंभीर आरोप बृजभूषण शरण सिंह यांनी केला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारतात बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालटाचा प्रयत्न’ असं या आंदोलनाचं वर्णन केलं. ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जे काही घडत आहे किंवा दिल्लीत अलीकडे घडलेल्या घटनांमधून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्ये असं दिसतंय की, काँग्रेस आणि त्यांचे काही राजकीय मित्रपक्ष हे थेट किंवा आपापल्या संलग्न संघटनांच्या माध्यमातून तरुणांची ऊर्जा राष्ट्रनिर्माणाकडे वळवण्याऐवजी राजकीय संघर्ष आणि अराजकता निर्माण करण्याचं साधन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.
“बांगलादेशातील घटनांच्या धर्तीवर काही लोक सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एका पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने हे उघडपणे म्हटलंही आहे. त्यामुळे यावरून हे स्पष्ट होतं आहे की त्यांचा एकमेव अजेंडा लोकशाही संस्था उद्ध्वस्त करणं आणि देशाला आगीत लोटणं हाच आहे. सत्तापालट या सारख्या शब्दांचा वापर हेच दर्शवत आहे की त्यांचा संघर्ष निवडणुकीच्या सुधारणांबाबत किंवा एसआयआरबाबत किंवा ज्ञानेश कुमारांच्या विरोधात नाही. त्यांची ही लढाई देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील नाही. उलट त्यांची ही लढाई देशात अराजकता निर्माण करून सत्ता हस्तगत करण्यासाठी हा एक कट आहे”, असा गंभीर आरोप राजनाथ सिंह यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.
No Comment! Be the first one.