अस्वच्छता, प्रयोगशाळा चाचण्यांचा अभाव; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई — पोल ॲग्रो इंडस्ट्रीजचा अन्न परवाना तातडीने निलंबित
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
गंगापूर: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने लासूर स्टेशन येथील मेसर्स पोल ॲग्रो इंडस्ट्रीज या तेल पुनर्पॅकिंग युनिटवर १५ ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ९ हजार १६५ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १५ लाख २ हजार ५०० रुपये आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित युनिटचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने लासूर स्टेशन येथील मालमत्ता क्रमांक २४४८ येथे असलेल्या कारखान्याची अचानक तपासणी केली. या वेळी ‘सोनेरी’ आणि ‘रुपेरी’ या ब्रँडच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा आढळून आला. त्यापैकी सोनेरी ब्रँडचे ७ हजार ३६० किलो तेल, ज्याची किंमत ११ लाख ७७ हजार ६०० रुपये, तर रुपेरी ब्रँडचे १ हजार ८०५ किलो तेल, ज्याची किंमत ३ लाख २४ हजार ९०० रुपये आहे, असा एकूण ९ हजार १६५ किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला.
तपासणीत स्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी
कारखान्याच्या तपासणी अहवालानुसार, ८६ पैकी केवळ १९ गुण मिळाले असून, अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. कच्च्या तसेच तयार तेलाच्या प्रयोगशाळा तपासणीच्या नोंदी उपलब्ध नसणे, पूर्णवेळ तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती नसणे, कारखान्यातील फरशी तेलकट व चिकट असणे, मशिनरी आणि भिंतींवर तेलाचे थर साचणे, तसेच उत्पादन विभागात अन्नकचरा पडून असणे, अशा त्रुटी आढळल्या.
याशिवाय कारखान्यात योग्य वायुविजनाची व्यवस्था नसणे, भिंतींचे प्लास्टर व रंग उखडलेले असणे आणि कीटक व उंदीर प्रतिबंधक उपाययोजना कार्यरत नसणे, या बाबीही तपासणीत समोर आल्या. उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या अर्धवार्षिक तपासणीच्या नोंदी तसेच पॅकेजिंग साहित्य अन्नपदार्थांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्रही उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले.
प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कारवाई
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३८(१)(सी) अंतर्गत जप्त करण्यात आलेला तेलाचा साठा सील करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.
या कारवाईमुळे लासूर स्टेशन परिसरातील खाद्यतेलाच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो आणि संबंधित संस्थेविरुद्ध पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.