एलसीबी पथकाचा अंतरवाली सराटीत फिल्मी स्टाईल पाठलाग; महिलेच्या डोळ्याखाली चावा घेऊन केली होती मारहाण
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण
पैठण तालुक्यातील आपेगाव येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेच्या गळ्यातील सुमारे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून, कानातील सोन्याची फुले देण्यास विरोध केल्याने तिच्या डोळ्याखाली चावा घेऊन जखमी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अंतरवाली सराटी येथून जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला पकडले.
संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथील ताराबाई दिनकर ठेंनगे (वय 50) या आगापूर शिवारातील गट क्रमांक 10 मधील शेतात सरकीला पाणी देत होत्या. 16 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्याकडे विचारपूस करण्याचा बहाणा केला.
यानंतर चोरट्यांनी ताराबाई यांच्या अंगावरील सुमारे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. कानातील सोन्याची फुले काढून देण्यास त्यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्या डोळ्याखाली चावा घेतला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि वैभव सारंग, बीट जमादार राजेंद्र जिवडे आणि हवालदार शुभम पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी ताराबाई यांना उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ताराबाई यांच्या मुलाची मोटारसायकलही अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव रणखांबे, सफौ थोटे, पाटील आणि ढाकणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान रोहित निलेश उर्फ निल्या पवार (रा. चंदनपुरी, ता. अंबड, जि. जालना), फयाज उर्फ सल्ल्या शेरू संतोष काळे (रा. साकेगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; हल्ली रा. चंदनपुरी, अंबड) आणि शाहरुख अब्राशा पवार (रा. नालेवाडी, ता. अंबड) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यातील प्रमुख आरोपी फयाज उर्फ सल्ल्या काळे हा अंतरवाली सराटी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने अंतरवाली सराटी येथील उड्डाणपूल परिसरात सापळा रचला.
आरोपीला पोलीस पथकाची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून अखेर फयाज उर्फ सल्ल्या शेरू संतोष काळे याला जेरबंद केले.
या गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपींचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत.
No Comment! Be the first one.