वाळूने भरलेली हायवा जप्त; १५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चालक फरार
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू असल्याची माहिती पैठण पोलिसांना मिळताच पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करत वाळूने भरलेली टाटा हायवा जप्त केली. या कारवाईत तब्बल १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, वाहनचालक पोलिसांना पाहताच वाहन सोडून फरार झाला. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पैठण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार रोजी पहाटे बीट जमादार राजेंद्र जिवडे, पोलीस हवालदार संदीप पाटेकर व कृष्णा दुबाले यांच्या पथकाने नायगाव रोडवर कारवाई केली.
यावेळी वाळूची तस्करी करणारे टाटा हायवा वाहन क्रमांक MH-20-E-9901 पोलिसांना आढळून आले. पोलीस पथक आल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने वाळूने भरलेली हायवा जागेवरच सोडून पळ काढला. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईत १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बीट जमादार राजेंद्र जिवडे करीत आहेत.
महसूल विभागाच्या पथकाची भूमिका काय?
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्र व नदी परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पैठण पोलीस अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना दुसरीकडे महसूल विभागाचे वाळूविरोधी पथक नेमके काय करत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
No Comment! Be the first one.