अंबड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार अंबड
अंबड :शासकीय मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बांधकामास विरोध केल्याच्या कारणावरून तिघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंबड शहरातील गुरुप्रसादनगर शिक्षक कॉलनी परिसरात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणाबाबत अंबड नगर परिषदेकडेही तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत येथील शासकीय कंत्राटदार नारायण शंकरराव मुंडे (वय ३९, रा. गुरुप्रसादनगर शिक्षक कॉलनी, अंबड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अशोक सव्वासे, सोमेश्वर बुलबुले व संजय पिसे हे त्यांच्या घरासमोरील मोकळ्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम करीत होते. ही जागा शासकीय असून येथे बांधकाम का करीत आहात, अशी विचारणा मुंडे यांनी केली असता तिघांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंडे यांचे वाहनचालक राजेंद्र शेळके हे संबंधितांना समजावून सांगण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (२) व ३ (५) अन्वये एनसीआर क्रमांक १११५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पोलिस करीत आहेत.
दरम्यान, नारायण मुंडे यांनी याच प्रकरणी अंबड नगर परिषदेकडेही तक्रार दिली आहे. याबाबत नगर परिषदेकडून चौकशी करण्यात येत आहे. ओपन स्पेसमध्ये विनापरवाना कोणतेही बांधकाम करणे बेकायदेशीर आहे. याबाबत चौकशी करून नियमानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी दिली.
No Comment! Be the first one.