तीन महिन्यांपासून बँकेचे हेलपाटे; संतप्त शेतकऱ्यांनी सेंट्रल बँकेला ठोकले टाळे, दोन दिवसांचा अल्टिमेटम
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : मागील पीककर्जमाफीची खाती अद्याप बंद न झाल्याने लासूर स्टेशन येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील तब्बल ९०० शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरातील शेतकरी पीककर्जासाठी बँकेचे हेलपाटे मारत असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला टाळे ठोकले. विशेष म्हणजे हे एकाच बँके शाखेतील प्रकरण असून लासुरमध्ये अशा विविध नॅशनलाईज बँकेच्या शाखा आहेत. त्यात असे किती शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे हे पाहणी देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पीककर्जमाफीअंतर्गत पूर्वीची कर्जखाती आजतागायत बंद न झाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी बँकेकडे पाठपुरावा करत आहेत. या गंभीर समस्येबाबत लासूर स्टेशन शाखेच्या शाखाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला कळविले असून, क्षेत्रीय कार्यालयानेही वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रश्न मांडला आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
एका बाजूला शेतीच्या हंगामासाठी पैशांची गरज असताना केवळ प्रशासकीय प्रक्रियेमुळे ९०० शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावेळी आगामी दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करून प्रत्यक्ष वाटप सुरू न केल्यास जिल्हाभरातील सेंट्रल बँकेच्या शाखांना टाळे ठोकण्याचा इशारा भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वतीने देण्यात आला आहे. आता वरिष्ठ बँक प्रशासन या प्रश्नावर किती तत्परतेने निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेयकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शाखा अधिकाऱ्यासह बँकेतील कर्मचाऱ्यांना बाहेर ताटकळत बसावे लागले.

No Comment! Be the first one.