धनसिंह सूर्यवंशी यांच्या नामकरणाच्या मागणीला वाढता प्रतिसाद; २३ नोव्हेंबरच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवण्याचे आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
जालना शहराचे नाव बदलून ‘जनकपूर’ करण्यात यावे, या मागणीने आता जोर धरला आहे. हिंदू महासभेनंतर शहरातील व्यापारी महासंघ आणि भाजपच्या नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जालन्याचे नामकरण ‘जनकपूर’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जालन्याचे नामकरण ‘जनकपूर’ करण्यात यावे, ही मागणी सर्वप्रथम हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी लावून धरली होती. सुरुवातीला एका संघटनेपुरती मर्यादित असलेली ही मागणी आता शहरातील विविध घटकांपर्यंत पोहोचली असून, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत असल्याने या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, येत्या २३ नोव्हेंबर रोजी जालना महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेत जालन्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जालन्याचे नाव ‘जनकपूर’ करण्याच्या मागणीसाठी ठराव मांडावा आणि एकमुखाने आवाज उठवावा, असे आवाहन हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी केले आहे.
व्यापारी महासंघ आणि भाजप नगरसेवकांनी दिलेला पाठिंबा पाहता नामकरणाच्या मागणीला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. आता महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक काय भूमिका घेतात आणि शासनस्तरावर याबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जालना शहराचे लक्ष लागले आहे.
धनसिंग सूर्यवंशी यांच्या पुढाकाराला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता जालना शहराच्या नामकरणाचा मुद्दा आगामी काळात निर्णायक वळण घेण्याची शक्यता आहे.

No Comment! Be the first one.