लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उपळा (कालीमठ) येथील बहुचर्चित श्री कालीमठ ट्रस्टच्या कारभारातील आर्थिक अनियमितता व प्रशासकीय दुर्लक्ष प्रकरणी सहधर्मादाय आयुक्त एन. एन. जाधव यांनी ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी रंगनाथ सोनवणे यांना पदावरून पदमुक्त करण्याचे आदेश देत.त्यांची हकालपट्टी केली.या निर्णयानंतर कालीमठ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी कालीमठ संस्थान उपळा येथे फटाके फोडून जल्लोष केला.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की,प्रतिवादी क्रमांक १ श्री. शिवाजी रंगनाथ सोनवणे यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१ ड (१)(अ) अन्वये, श्री कालीमठ ट्रस्ट, उपळा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक ए-३४१४, औरंगाबाद) च्या विश्वस्तपदावरून याद्वारे काढून टाकण्यात येत आहे.
नागरिकांच्या तक्रारी व ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर ट्रस्टची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवालात २०१० ते २०२२ या कालावधीत वार्षिक अंदाजपत्रक सादर न केल्याचे, कार्यालयाच्या परवानगीशिवाय १५.५० लाख रुपयांची मुदत ठेव मोडून ती ८.५० लाखांवर आणल्याचे, ७ लाख रुपये व ८.२८ लाख रुपयांच्या अनामत रकमेचा हिशेब न दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच पूर्वपरवानगीशिवाय सहा दुकाने व खताचे गोदाम भाड्याने देणे, ऑडिट आक्षेप प्रलंबित ठेवणे, अनधिकृत वृक्षतोड करणे या बाबीही निदर्शनास आल्या. वृक्षतोडीबद्दल ८४ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.सार्वजनिक निधीच्या संरक्षणासाठी वैधानिक नियमांचे पालन आवश्यक असल्याचे नमूद करत आयुक्तालयाने पदमुक्तीचेचे आदेश दिले. गेल्या वर्षभरात धर्मादाय आयुक्तालयाने अशाच प्रकारच्या २७ ट्रस्टवर कारवाई केली आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना हा परमपूज्य स्वामी प्राणवानंद सरस्वती महाराज यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून, ही पवित्र जबाबदारी असल्याची भावना समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. परमपूज्य राज चैतन्य महाराज व स्वामी उद्घोष चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कामात उपळा गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गुरुबंधू यांचे योगदान लाभले. कायदेशीर कामकाजात ॲड.धोरडे पाटील, प्रवीण कवडे व ॲड. ढमाले यांनी काम पाहिले. ट्रस्टचा कारभार आता पारदर्शकपणे चालेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


No Comment! Be the first one.