अवैध मुरूम वाहतुकीची रॉयल्टी मागितल्याने तलाठ्याला शिवीगाळ; दोघांविरुद्ध पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे अवैध मुरूम वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग तलाठ्याला मुरूम तस्करांकडून धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (दि. १९) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विहामांडवा येथील बाजार समितीजवळील मुख्य रस्त्यावरून विनाक्रमांकाच्या मिनी हायवा वाहनातून सुमारे दोन ब्रास मुरमाची अवैध वाहतूक सुरू असल्याची बाब विहामांडवा-हिरडपुरी सजेचे तलाठी ओमप्रकाश महादेव चाटे (रा. पन्नालालनगर, पैठण) यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सदर वाहन थांबवून मुरूम वाहतुकीची रॉयल्टी (परवाना) विचारली.
याचदरम्यान नवाज रहीमखा पठाण हा चारचाकी वाहनातून घटनास्थळी आला. मुरमाची रॉयल्टी नसल्याचे सांगत त्याने तलाठी ओमप्रकाश चाटे यांना शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुरूम वाहतूक करणारे वाहन घटनास्थळावरून पळवून नेण्यात आले.
या प्रकारानंतर तलाठी ओमप्रकाश चाटे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून नवाज रहीमखा पठाण व नवाज बाबा सय्यद (दोघे रा. विहामांडवा, ता. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित करीत आहेत.
दिव्यांग तलाठ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची मौन भूमिका!
शासकीय कर्तव्य बजावत असताना दिव्यांग तलाठ्याला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यासारखी गंभीर घटना घडली असतानाही पैठण तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळण्यात आल्याने महसूल विभागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरच अशा प्रकारे दबाव आणला जात असेल, तर अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
No Comment! Be the first one.