मागण्या मान्य न झाल्यास २८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली
हिंगोली : तालुक्यातील केसापूर गावात जलजीवन मिशनची नळ पाणीपुरवठा योजना सुरू असूनही गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील जलजीवन विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे पाटील यांनी १९ नोव्हेंबर रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, हळदवाडी तलावापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या जलजीवन विहिरीत पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. विहिरीवर केवळ एक तास मोटार चालल्यानंतर विहीर कोरडी पडते. त्यामुळे महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. नागरिकांवर टँकरद्वारे पाणी विकत घेण्याचा आर्थिक भार पडत आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना म्हणून जलजीवन विहिरीचे खोलीकरण करणे, पाणी उपलब्ध न झाल्यास दुसरा बोअर किंवा नवीन विहीर खोदणे, तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींचे नियमानुसार अधिग्रहण करून तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय नरसी येथील तलावातून पाणी आणून पिरमळ येथे फिल्टर बसविणे किंवा जलजीवन योजनेसाठी स्वतंत्र फिल्टर व्यवस्था उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी तात्पुरता पाणीपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
पाणीपुरवठा अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन विहीर, तलाव व फिल्टरची पाहणी करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२८ नोव्हेंबरला धरणे आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास २८ नोव्हेंबर रोजी केसापूर येथील महिला, शेतकरी व शेतमजूर जिल्हा परिषद कार्यालय, हिंगोली येथे धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन शांततामय, अहिंसक व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

No Comment! Be the first one.