लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर दाम्पत्य राजस्थानला देवदर्शनासाठी गेले अन् चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल ९ लाख ४५ हजारांची रोकड आणि महागडा टीव्ही लंपास केला. या घरफोडीचा छडा लावत MIDC वाळूज पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि चोरीचा टीव्ही असा १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता डॉ. राजेंद्र झुंबरलाल काला हे पत्नीसह राजस्थानमधील उदयपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी किचनचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून ९ लाख ४५ हजारांची रोकड आणि सोनी कंपनीचा टीव्ही चोरून नेला. या प्रकरणाचा तपास करताना MIDC वाळूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे १८ नोव्हेंबर रोजी गंगापूर येथून चौघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश शंकर शर्मा (३०, मनमाड), श्रीराम सोमनाथ सोनवणे (२४, जांतेगाव, वैजापूर), ईश्वर परमेश्वर काजळे (२६, बोथगाव, शेवगाव) आणि गौरव सोमनाथ सोनवणे (२५, जांतेगाव, वैजापूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून बजाज पल्सर मोटारसायकल आणि सोनी कंपनीचा ४२ इंची स्मार्ट टीव्ही जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

No Comment! Be the first one.