कार्तिकी एकादशीला भूमिपूजन; मंदिरासह भक्तनिवास, ध्यान मंदिर, विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि वृद्धाश्रमाची उभारणी..
लोकार्थ चंद्रकांत प्रतिनिधी अंबिलवादे पैठण
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पैठण नगरीच्या धार्मिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर पाटेगाव परिसरात तब्बल ११ कोटी रुपये खर्चून भव्य श्री खाटूश्याम मंदिरासह विविध धार्मिक व सामाजिक सेवाभावी प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या पावन मुहूर्तावर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
श्रीहरिकृपा सेवा समितीच्या वतीने हा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. समितीचे अध्यक्ष सतीश उदावंत यांनी लोकार्थ प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली.
श्रीसंत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने आणि आपेगाव येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणच्या भूमीत हा आध्यात्मिक प्रकल्प साकारला जाणार आहे. धार्मिक कार्यासोबतच अन्नदान आणि सामाजिक सेवेच्या माध्यमातून श्रीहरिकृपा सेवा समितीने पैठणमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच सेवाभावी कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने श्री खाटूश्याम मंदिर उभारणीचा संकल्प समितीने हाती घेतला आहे.
मंदिरासोबत उभारणार विविध सेवाभावी प्रकल्प
या प्रकल्पामध्ये भव्य श्री खाटूश्याम मंदिर, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी श्री श्याम भक्तनिवास, ध्यान व साधनेसाठी श्री श्याम ध्यान मंदिर, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी श्री श्याम बँक्वेट हॉल, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह तसेच सुंदर उद्यान विकसित करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत निवास, काळजी, आपुलकी आणि सन्मान मिळावा, या उदात्त हेतूने ‘हारे का सहारा’ या नावाने वृद्धाश्रमाची उभारणी करण्यात येणार आहे.
दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
सुमारे ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा संपूर्ण प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचा श्रीहरिकृपा सेवा समितीचा मानस आहे. हा प्रकल्प केवळ धार्मिक स्थळ न राहता भक्ती, आध्यात्मिक चिंतन, शैक्षणिक सुविधा आणि सामाजिक सेवेचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे पैठणच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सुविधा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आधार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वावर होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यास भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीहरिकृपा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No Comment! Be the first one.