कन्नड
खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधेची लक्षणे; सात वर्षीय मुलाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नातून विषबाधा झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्रीच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी सिल्लोडला नेत असताना सात वर्षीय मुलाचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या बहिणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिंचोली लिंबाजी येथील नारायण थोटे यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडली. रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्या घरी खिचडी तयार करण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास नारायण थोटे, त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष या चौघांचीही प्रकृती अचानक खालावली. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.
प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, त्रास वाढत गेल्याने चौघांनाही गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना सिल्लोड येथे नेण्याचा सल्ला दिला.
यानंतर उपचारासाठी सिल्लोडच्या दिशेने नेत असताना सात वर्षीय आयुष नारायण थोटे याची प्रकृती अधिकच खालावली आणि वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची लहान बहीण गायत्री हिची प्रकृतीही चिंताजनक असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील चार जणांनी रात्री खिचडी खाल्ल्यानंतर अचानक आजारी पडणे आणि त्यात एका चिमुकल्याचा मृत्यू होणे, या घटनेने चिंचोली लिंबाजी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे कन्नड तालुक्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

No Comment! Be the first one.