२ किलोचा चांदीचा मुकुट, मोदक लंपास; श्वानपथक दाखल
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध श्री क्षेत्र जागृत गणपती संस्थान, गणेशपूर येथे मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत रात्री अंदाजे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील मोठे प्रवेशद्वार व गाभाऱ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी गणपती बाप्पाचा सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा मुकुट आणि अडीचशे ग्रॅम वजनाचा चांदीचा मोदक, चांदीचा उंदीर, तसेच गाभाऱ्यातील काही सोन्या-चांदीचे दागिने व वस्त्रे लंपास केली आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा तपास सुरू करण्यात आला असून, आज सकाळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील व गावातील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
या घटनेमुळे गणेशपूर परिसरातील भाविक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व चिंता व्यक्त केली जात असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी होत आहे.
चोरट्यांनी नेलेला मुद्देमाल (प्राथमिक माहिती)गणपती बाप्पाचा चांदीचा मुकुट(२ किलो),चांदीचा उंदीर,चांदीचा मोदक (२५० ग्रॅम- गाभाऱ्यातील काही सोन्या-चांदीचे दागिने.

No Comment! Be the first one.