लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
परभणी पितृपक्षाच्या निमित्ताने श्री लक्ष्मी नृसिंह उपासना मंडळ व भागवताचार्य श्री विलासगुरु लिंबेकर आयोजित नारदिय किर्तन महोत्सवाला तिसऱ्या वर्षीही भाविकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.
गेली तीन दिवस परभणी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये तृतीय दिवशी ह.भ.प. सौ.अंबिका लिंबेकर यांनी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म या जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण केले.
आपली निष्ठा एका भगवंताच्या ठिकाणी अनन्य असावी असे प्रतिपादन त्यांनी प्रस्तुत अभंगात केले.
सौ.अंबिका श्रीपाद लिंबेकर या नवाजलेल्या कीर्तनकार असून झाशी,कर्नाटक, हैदराबाद, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश व संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नामवंत कीर्तन महोत्सवात आपली कीर्तन सेवा देऊन त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली आहेत.
उत्तम गोड असा गळा, शास्त्रीय बैठक, अभ्यासु व्यक्तिमत्व विविध ग्रंथांवर प्रभुत्व आणि विषयाचा सुसूत्रपणा व स्पष्टता यामुळे श्रोते त्यांच्या कीर्तनामध्ये तल्लीन झाले.
उत्तर रंगांमध्ये हनुमान सेवा यांच्या अख्यानात मारुतीरायां प्रमाणे निष्ठा एका भगवंतावर ठेवली पाहिजे व जीवनाचे सार्थक केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
समाजकार्यात आपले योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाची दखल मंडळ नेहमी घेत असते. यात ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. माधवबुवा आजेगावकर, श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर आळंदी येथे विशेष सेवा दिल्याबद्दल डॉ. श्रीराम मसलेकर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती लक्ष्मीबाई गोविंदराव भारस्वाडकर मारुती मंदिर रामकृष्ण नगर येथे विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला, या शिवाय ह.भ.प. पुजारी काका, सदभक्त गजानन कुंडीकर अशा अनेक नामवंतांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.
या वर्षी ह.भ.प अपर्णाताई सहस्रबुद्धे सोलापूर, ह भ प विकास दिग्रसकर पुणे यांची कीर्तने झाली.
No Comment! Be the first one.