उत्पन्न घटलं , खर्चाचे गणित बिघडलं; सणासुदीच्या आनंदावरही काटकसर, घनसावंगी तालुक्यात आर्थिक ओढाताणीचे चित्र
घनसावंगी प्रतिनिधी : अविनाश घोगरे
दुष्काळ म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते ते कोरडे पडलेले शिवार, पाण्याअभावी करपलेली पिके आणि चारा-पाण्यासाठी भटकणारे पशुधन. मात्र, यंदाच्या दुष्काळाने केवळ शेतीचे नुकसान केलेले नाही, तर ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या जगण्याचे संपूर्ण गणितच विस्कळीत केले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, शेतमजुरांना रोजगार मिळत नाही आणि छोट्या व्यावसायिकांची उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावले असून, प्रत्येक कुटुंबाला खर्च करताना दहावेळा विचार करण्याची वेळ आली आहे.
पूर्वी दिवाळीचा सण जवळ आला की घराघरांत खरेदीची लगबग सुरू व्हायची. नवीन कपडे, मुलांसाठी फटाके, फराळाचे साहित्य, घराची रंगरंगोटी आणि पाहुण्यांच्या स्वागताची तयारी यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असायचे. मात्र, यंदा दुष्काळाच्या झळा सणासुदीच्या आनंदावरही पडल्या आहेत. अनेक कुटुंबांनी नवीन कपड्यांची खरेदी मर्यादित केली, मुलांच्या फटाक्यांच्या खर्चाला कात्री लावली, तर काहींनी फराळाचे पदार्थही मोजकेच करण्याचा निर्णय घेतला. दिवाळी साजरी करायची आहे; मात्र हातात पैसा नसल्याने आनंदालाही आर्थिक परिस्थितीची मर्यादा आली आहे.
शेतात दिवसरात्र राबूनही शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित उत्पन्न पडलेले नाही. कापूस, सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बियाणे, खते, औषधफवारणी आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कुटुंबे उसनवारी करून घरखर्च भागवत आहेत, तर काहींनी दैनंदिन गरजांनाही मर्यादा घातल्या आहेत.
दुष्काळाचा परिणाम आता गावातील बाजारपेठेवरही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, फटाका दुकाने. हॉटेल आणि अन्य छोट्या व्यावसायिकांकडे ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. पूर्वी सणासुदीच्या काळात होणारी खरेदी यंदा मर्यादित राहिली आहे. ग्राहक कमी झाल्याने व्यापाऱ्यांची उलाढाल घटली असून, दुकानांचे भाडे, वीजबिल आणि इतर खर्च भागविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असलेली ग्रामीण बाजारपेठही त्यामुळे आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडली आहे.
दुष्काळाची झळ आता केवळ घरखर्चापुरती मर्यादित राहिलेली नाही. मुलांचे शिक्षण, शाळेची फी, वह्या-पुस्तके, औषधोपचार आणि इतर कौटुंबिक गरजांवरही त्याचा परिणाम होत आहे. पूर्वी सहज परवडणाऱ्या गरजांसाठीही आता कुटुंबांना आर्थिक ताळमेळ घालावा लागत आहे. एखादा अनपेक्षित खर्च समोर आला, तर त्यासाठी दुसऱ्या गरजेचा खर्च पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
एकीकडे शिवारातील पिके हातची गेली, दुसरीकडे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आणि त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेतकऱ्यांपासून शेतमजूर, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत दुष्काळाचे संकट पोहोचले आहे. त्यामुळे यंदाचा दुष्काळ हा केवळ पिकांच्या नुकसानीचा विषय राहिलेला नाही, तर ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावर परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे.
घराघरांत दिव्यांची रोषणाई झाली असली, तरी अनेकांच्या मनात आर्थिक चिंतेचा अंधार कायम आहे. दिवाळीचा सण साजरा होत असताना खरेदीपेक्षा गरजांना, हौसेपेक्षा काटकसरीला आणि आनंदापेक्षा उद्याच्या खर्चाच्या चिंतेला प्राधान्य देण्याची वेळ घनसावंगी तालुक्यातील सामान्य कुटुंबांवर आली आहे. यंदा दिवाळीतील दिव्यांचा प्रकाश उजळला असला, तरी दुष्काळाने सामान्य माणसाच्या आयुष्यातील आर्थिक अंधार अधिक गडद केला आहे.
++++++++++++++++++++++
दिवाळीच्या काळात दरवर्षी किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. फराळाचे साहित्य, तेल, साखर, रवा, मैदा यांसह जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र, यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने ग्राहक खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. पूर्वी महिनाभराचे किराणा साहित्य घेणारे ग्राहक आता गरजेपुरत्याच वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे विक्री आणि उलाढालीवर परिणाम झाला असून, दिवाळीच्या हंगामातही अपेक्षित व्यवसाय होत नाही.”
रंजित घोगरे,
संचालक, अपूर्वा किराणा :
++++++++++++++++++++++
दिवाळी म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फटाक्यांची आतषबाजी करण्याची उत्सुकता असते. दरवर्षी दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र, यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याचा थेट परिणाम फटाक्यांच्या खरेदीवर जाणवत आहे. ग्राहक दुकानात येत असले, तरी पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करत नाहीत. अनेकजण महागड्या फटाक्यांऐवजी मोजकेच फटाके घेत आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीच्या उत्साहावर आर्थिक परिस्थितीचे सावट दिसत आहे.”
योगेश भोसले
फटाका दुकानदार
++++++++++++++
दिवाळी म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फटाक्यांची आतषबाजी करण्याची उत्सुकता असते. दरवर्षी दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र, यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याचा थेट परिणाम फटाक्यांच्या खरेदीवर जाणवत आहे. ग्राहक दुकानात येत असले, तरी पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करत नाहीत. अनेकजण महागड्या फटाक्यांऐवजी मोजकेच फटाके घेत आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीच्या उत्साहावर आर्थिक परिस्थितीचे सावट दिसत आहे.”
स्वप्निल कोल्हे पाटील मेन्स वेअर
================================
यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडले आहे. शेतात पेरणीपासून काढणीपर्यंत हजारो रुपये खर्च केले; मात्र पावसाने दडी मारल्याने कापसाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. एक क्विंटल कापूसही एकरी निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे केलेला खर्चही वसूल झाला नाही. दिवाळी सण आला, पण घरात आनंदापेक्षा चिंताच अधिक आहे. मुलांचे कपडे, फराळ आणि इतर खर्च करतानाही हात आखडता घ्यावा लागत आहे. यंदा दिवाळी साजरी करण्यापेक्षा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हीच चिंता सतावत आहे.
सूर्यकांत धबडकर
शेतकरी मांदाळा
================================
दुष्काळ सोसणारे आणि दुष्काळात होरपळणारे लातूर
No Comment! Be the first one.