अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; कारसह ११ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त.
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे, पैठण.
पैठण तालुक्यातील बिडकीन-लोहगाव मार्गावरील तोंडोळी परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर बिडकीन पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची विनाक्रमांक कार पकडली. या कारमधून विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून, कारसह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोहगाव-बिडकीन मार्गावरून अवैधरित्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित गुटख्याची वाहनातून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी व पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एम. तडवी यांनी विशेष पथक तयार केले.
पोलीस उपनिरीक्षक झुंजुर्डे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वाल्मीक निकम, शेख, नाडे, वाघमोडे व दिलवाले यांच्या पथकाने बिडकीन-लोहगाव रोडवरील तोंडोळी परिसरात सापळा रचला. काही वेळातच या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची विनाक्रमांक कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून त्यातील दोघांकडे चौकशी केली. गाडीला नंबर का नाही व कुठे जात आहात, अशी विचारणा केली असता त्यांनी दिलेली उत्तरे विसंगत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी सुनील जयराम ढोले (रा. टेभापुरी, ता. गंगापूर) आणि अलीम अहमद पटेल (रा. जिकठाण, ता. गंगापूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार व प्रतिबंधित गुटख्यासह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, हा गुटखा कोणत्या पुरवठादाराकडून आणण्यात आला होता, तसेच त्याची विक्री नेमकी कोणाला केली जाणार होती, याचा शोध बिडकीन पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


No Comment! Be the first one.