पाच लाखांची रोकड हिसकावणाऱ्या रोड रॉबरीचा छडा; पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड व रमेश जारवाल यांची महत्त्वपूर्ण कामगिरी
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
नवीन कायगावकडे जात असलेल्या बँक कर्मचाऱ्याची पाच लाख रुपये रोख असलेली पिशवी हिसकावून पळून गेलेल्या रोड रॉबरी प्रकरणातील दोन आरोपींना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड व रमेश जारवाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडून गंगापूर येथे आणले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४ अन्वये हा गुन्हा दाखल आहे. २२ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजता गणेशवाडी गावाच्या अलीकडे डीपीजवळ ही घटना घडली होती.
औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कायगाव शाखेत कार्यरत असलेले विठ्ठल जगन्नाथ चव्हाण (वय ५०, रा. छत्रपती संभाजीनगर) हे एमएच-२०-बीआर-२३५३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून नवीन कायगावकडे जात होते. त्यावेळी अज्ञात मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या जवळील पाच लाख रुपये रोख असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड व रमेश जारवाल यांनी आरोपींचा शोध घेतला. त्यांनी सागर सोमनाथ अहिरे (वय २४, रा. जळगावफाटा, निफाड, जि. नाशिक) याला सायखेडा, ता. निफाड येथून विनाक्रमांकाच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्या प्राथमिक चौकशीत त्याने साथीदार सिद्धार्थ मनोहर साळवे (वय २८, रा. सुंदरपूर, ता. निफाड, जि. नाशिक) आणि अन्य साथीदारांसह मोटारसायकल व चारचाकी वाहनाच्या मदतीने गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँक कर्मचाऱ्याची पाच लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींना गंगापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एन. पठाण पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड व रमेश जारवाल यांनी आरोपींना पकडून आणत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

No Comment! Be the first one.