गोशाळा महासंघ, जिल्हा हिंगोली यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका गोशाळांनाही बसत आहे. चारा व पाण्याची टंचाई, वाढता खर्च आणि जनावरांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राज्यातील सर्व गोशाळांमधील पशुधनासाठी प्रतिपशू प्रतिदिन १०० रुपये अनुदान मंजूर करावे, अशी मागणी गोशाळा महासंघ, जिल्हा हिंगोली यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला असताना गोशाळांमधील पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गोशाळा दानशूर व्यक्तींच्या मदतीवर आणि लोकसहभागातून चालवल्या जातात. मात्र, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा, पाणी आणि पशुखाद्याचा खर्च भागविणे कठीण होत आहे. परिणामी, गोशाळा चालकांसमोर पशुधनाचे संगोपन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काही शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत असून, अशा परिस्थितीत गोशाळांवरील जबाबदारीही वाढत आहे. पशुधनाचे संरक्षण, चारा-पाण्याची उपलब्धता आणि गोशाळांचे व्यवस्थापन सुरळीत राहण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील गोशाळांमधील पशुधन वाचविण्यासाठी आणि दुष्काळाच्या संकटात गोशाळांना आधार देण्यासाठी प्रतिपशू प्रतिदिन १०० रुपये अनुदान तातडीने मंजूर करावे, अशी मागणी गोशाळा महासंघाचे प्रकाशचंद्र सोनी यांनी केली आहे. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
No Comment! Be the first one.