ट्रेलर चालकाचा जागीच ठार तर पोलीस हवालदार गंभीर जखमी
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील आसना पुलावर २८ ऑक्टोबर रोजी रात्री एक अत्यंत भीषण साखळी अपघात घडला असून दुर्घटनेत एका भरधाव मालवाहू वाहनाचा चालक जागीच ठार झाला आहे. वाहतूक सुरळीत करणारे विमानतळ पोलीस ठाण्याचे हवालदार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेल्या १२ तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
हैदराबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर (आर.जे.१४ जी. एल.९२६८) आणि एका चारचाकी कारचालकामध्ये कट मारण्यावरून वाद झाला. या किरकोळ अपघाता मुळे आसना पुलावर दोन्हीं वाहने थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिसांना तात्काळ कळवले. तर काहींनी उपस्थितांनी ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना लगेच माहिती दिली. सदर माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार व्यंकटेश आलेवार (बक्कल क्र. ९८८) व इतर अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वप्रथम रस्त्यावरील ट्रॅफिक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
पोलीस जमादार आलेवार हे पुलावर कर्तव्य बजावत असतानाच पाठीमागून लोखंडी गजाळ्या घेवुन येणाऱ्या भरधाव मल्टी-एक्सल मालवाहू वाहना वरील (जी.जे.३९ टी.ए.७४२४) चालकाचे नियंत्रण सुटले. या वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून अत्यंत जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रेलरचा चालक दोन्हीं वाहनांच्या मध्ये चिरडला जाऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात वाहतूक सुरळीत करणारे पोलीस हवालदार व्यंकटेश आलेवार यांच्या पायाला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी यशोसाई रूग्णालया मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची तीव्रता अत्यंत भीषण असल्याने दोन्हीं मालवाहू वाहने एकमेकांत अडकली होती तर दोन्हीं वाहनांच्या मध्ये फसलेल्या मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रात्रभर अग्निशामक दल,क्रेन आणि पोलिसांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.सकाळी गॅस कटरच्या साह्याने पत्रे आणि सांगाडा कापून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू राहिले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी विजय पाटील,पोलिस उपनिरीक्षक जरार अहमद,अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरळीत करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.