परभणी जिल्ह्यात पीक परिस्थितीचा आढावा; पंचनाम्याची कार्यवाही युद्धपातळीवर
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
जिल्ह्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामान व पावसाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही वेगाने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व शासनाच्या नियमानुसार लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
जिल्ह्यातील संबंधित महसूल, कृषी व ग्रामस्तरीय यंत्रणांना पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची स्थिती, नुकसानीचे स्वरूप व बाधित क्षेत्राची माहिती संकलित करीत आहेत.
पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, प्राप्त माहितीच्या आधारे शासनाच्या प्रचलित निकषांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पंचनामे चालू असलेल्या कामकाजाची उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन पाणी करून सूचना केल्या.
शेतकऱ्यांनी सहकार्य करावे
पंचनाम्याच्या वेळी शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. आपल्या शेतातील पिकांची सद्यस्थिती व झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक अथवा संबंधित महसूल यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No Comment! Be the first one.