लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड (म नेता) नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे.
परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. या दरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे.
13 ऑक्टोबर रोजी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 3 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी ‘संवाद’ साधला. या दरम्यान 26 तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे सोपविले. यात मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, मारहाणी बाबत, दाखल गुन्ह्यांचा तपास, फसवणूक, कौटुंबिक वाद इत्यादी तक्रारींचा समावेश आहे. या दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी ‘जनसंवाद उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहे. प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे. याप्रसंगी, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व शहरातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे हजर होते.

No Comment! Be the first one.