हॉटेल जाळण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांची कडक कारवाई; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, गावात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
पाचोड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुंडागर्दीला लगाम घालण्यासाठी पाचोड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. गावातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी शनिवारी पोलिसांनी पाचोड गावातून रूट मार्च काढत शक्तिप्रदर्शन केले.
बुधवार, दि. ७ रोजी पाचोड येथील एका हॉटेलमधील मॅनेजर आणि कामगाराला काही तरुणांनी दुपारच्या सुमारास मारहाण केली होती. त्यानंतर सायंकाळी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाचोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर रोहित पुंडलिक नरवडे, रा. पाचोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन पंडित यांनी कारवाई करत कुणाल मस्के, शाहरुख शेख उर्फ गाठ, अजय म्हस्के, नागेश आहीरे, गजानन काळे, आदर्श उर्फ लाल्या नेमाणे, विठ्ठल एखंडे, शुभम मूंजाळे, बब्बू खलील पठाण यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शनिवारी पाचोड पोलिसांच्या पथकाने गावातून रूट मार्च काढला. पोलिसांच्या या शक्तिप्रदर्शनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट इशारा देतानाच नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
No Comment! Be the first one.