सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका घटनेमुळे वाद निर्माण झाला. श्रीमंत राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या कन्या आणि अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी सांगलीत येत गणपतीची आरती केली. मात्र, ही आरती विद्यमान युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून करण्यात आल्याने वादाला सुरुवात झाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी मुख्य गणपती मंदिरातील गाभाऱ्यात भाग्यश्री यांनी प्रवेश करून ठिय्या दिला. प्रतिष्ठापनेसाठी उत्सवमूर्ती हॉलमध्ये नेण्याची तयारी सुरू होती. यासाठी विद्यमान युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांना थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर भाग्यश्री यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत गणपतीची आरती केली. त्यांना आरती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र, हा विरोध असूनही भाग्यश्री यांनी आरती पूर्ण केली आणि त्यानंतर त्या मंदिराबाहेर पडल्या.
‘गणेशोत्सवाची प्राचीन परंपरा खंडित होता कामा नये’
या घटनेबाबत बोलताना अभिनेत्री भाग्यश्री यांनी सांगितले की, बऱ्याच वर्षांनंतर त्यांचे सांगलीला येणे झाले. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाची अनेक वर्षांची प्राचीन परंपरा पुढेही सुरू राहणे आवश्यक असल्याचे भाग्यश्री यांनी म्हटले.
तीन मुलींपैकी किमान एकीने यावेळी उपस्थित राहणे गरजेचे होते, त्यामुळे आपण गणेशोत्सवाच्या आरतीसाठी मंदिरात उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाग्यश्री पुढे म्हणाल्या की, या मंदिरात दर्शन घेत घेतच त्यांचे बालपण गेले आहे. सांगली आणि या मंदिराचा त्यांना कधीही विसर पडलेला नाही. त्यामुळे यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अधिकृत उत्तराधिकारी म्हणून युवराज आदित्यराजे पटवर्धन यांची नियुक्ती केली आहे. अशा परिस्थितीत आदित्यराजेंना विरोध करून आरती करण्यामागील कारण काय, असा प्रश्न भाग्यश्री यांना विचारण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही.
विजयसिंहराजे पटवर्धन यांचा संताप
या संपूर्ण प्रकारानंतर भाग्यश्री यांचे वडील विजयसिंहराजे पटवर्धन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाग्यश्रीला कोणताही अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी तिच्यासोबत तसेच तिच्या पतीसोबत कोणतेही व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट केले.
आपण राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले आहे, असे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी म्हटले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानमधील हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

No Comment! Be the first one.