पिंप्रीराजा येथे गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना; सात वर्षीय चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील पिंप्रीराजा येथे गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला, तर सात वर्षीय चिमुकल्यासह ११ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
विठ्ठल रामभाऊ जाधव (४५) आणि रमेश लहूजी बनसोडे (४५, दोघे रा. पिंप्रीराजा) अशी मृतांची नावे आहेत. गावाच्या वेशीवरून गणपतीची आगमन मिरवणूक सुरू असताना चितेगावकडून करमाडच्या दिशेने भरधाव निघालेला कंटेनर (क्र. एमएच २१ बीएच ७४९६) अचानक मिरवणुकीत घुसला.
रस्त्यावरील गतिरोधकावर आदळल्यानंतर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येते. कंटेनर डावीकडे वळण्याऐवजी सरळ पिंप्रीराजा गावात घुसला. त्यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला. कंटेनरने काही दुचाकी आणि पिकअपला धडक दिल्यानंतर पुढे ट्रॅक्टर व पिकअपलाही धडक दिली.
या दुर्घटनेत ११ ते १२ जण कंटेनरखाली फरफटत गेले. विठ्ठल जाधव व रमेश बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गणेश सुरेश पवार (३५) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा हर्षवर्धन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




No Comment! Be the first one.