पाणी वाटपातील असमतोल दूर करून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची मागणी
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १५, १६ व १७ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अपर-गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याकडे वळविण्याची मागणी समितीने केली आहे. २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेले १६८ टीएमसी पाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यांना तातडीने देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे.
मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पाचे मुख्यालय नाशिकऐवजी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करावे. तसेच कृष्णा खोऱ्यातून धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांसाठी मंजूर पाणी आणि विदर्भातील अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वळवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच तांबी, गुजदर्री, चांदेश्वरी (वाकला), सायगव्हाण, कोटी व राजगव्हाण या धरणांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळ पुनर्जीवित करून ठोस व कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी समितीने केली आहे

No Comment! Be the first one.