पार-गोदावरी, नार-पार नदीजोड योजनांसह रखडलेल्या साठवण तलावांचा आढावा
छत्रपती संभाजीनगर : लोकार्थ प्रतिनिधी
मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आणि अवर्षणप्रवण तालुक्यांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. पार-गोदावरी आणि नार-पार नदीजोड योजनांसह कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावावर उद्या, ३ नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२.३० वाजता ही बैठक होणार आहे.
मराठवाडा समन्वयाने पाणी वाटप संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे यांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत प्रामुख्याने सहा मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. पार-गोदावरी व नार-पार नदीजोड योजनेतील उपसा योजना क्रमांक ३ व ४ आणि सविस्तर प्रकल्प अहवालाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली जाणार आहे. तसेच कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील ६० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रशासकीय मान्यतेनुसार झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील चेवेल (डोंगरगाव) पर्यंत आलेल्या एक्स्प्रेस कालव्याची लांबी वाढवून वैजापूर, कन्नड आणि गंगापूर तालुक्यांतील साठवण तलावांमध्ये पाणी सोडण्याबाबत तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
मराठवाड्याच्या हक्काच्या आरक्षित पाण्याचे वितरण आणि सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी धोरणात्मक चर्चा होणार आहे. याशिवाय वैजापूर तालुक्यातील वाकला चांद्रेश्वर साठवण तलावाला प्रस्तावित योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडला जाणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गुजरी साठवण तलाव, राजगुहोरा साठवण तलाव, कोठी दुधमाळ साठवण तलाव, सायगव्हाण साठवण तलाव आणि वैजापूर तालुक्यातील वाकला साठवण तलाव या प्रकल्पांचे काम २०१० सालचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असूनही रखडले आहे. या प्रकल्पांना गती देण्याबाबतही चर्चा होणार आहे.
कुंभमेळा आणि उर्ध्व भागात नाशिक जिल्ह्यातील कालव्यासाठी बांधण्यात आलेल्या मुकणे धरणाचे पाणी मराठवाड्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वळविण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव येथील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच संबंधित अभियंत्यांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
No Comment! Be the first one.