पाचोड पोलिसांची कारवाई; ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, सराईत आरोपी ताब्यात
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण,
दि. १४ पैठण तालुक्यातील नांदर गावात सापळा रचून पाचोड पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून तब्बल ६ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांना वाळूज एमआयडीसीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्या विक्रीसाठी ग्राहक शोधले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस हेड कॉन्स्टेबल ताराचंद घडे, विलास घुगरे, अमलदार चरणसिंग बालोदे आणि योगेश केदारे यांच्या पथकाने नांदर गावात सापळा रचून पप्पू किसन उर्फ कृष्णा पवार (रा. नांदर, ता. पैठण) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गोविंद रोहिदास राठोड (रा. कडेठाण, ता. पैठण) याचा सहभाग असल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी पाचोड पोलीस पथकाने एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

No Comment! Be the first one.