शासकीय अधिकारी असल्याची थाप, सासरच्या छळाचा आरोप; माहेरच्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या सुखी संसारासाठी वडिलांनी कर्ज काढून लग्न लावून दिले; मात्र अवघ्या चार महिन्यांतच संजनाच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. हडको एन-१३ मधील वानखेडेनगरात संजना नीलेश शेजवळ (२३) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती शासकीय अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन लग्न लावल्याचा आणि सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
जालना येथील रावसाहेब मगरे यांची संजना धाकटी मुलगी होती. ४ जून २०२६ रोजी तिचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर पती शासकीय सेवेत नसल्याचे समोर आले. त्यानंतर स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
सोमवारी रात्री संजनाने आईला फोन करून त्रासाबद्दल सांगताना रडू कोसळले. वडिलांनी तिला धीर देत सकाळी भेटायला येण्याचे सांगितले. मात्र, मंगळवारी दुपारी तिने गळफास घेतला. रुग्णालयात तिच्या मृत्यूची माहिती मिळताच माहेरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सासरच्यांनी वेळेवर माहिती दिली नाही, असा आरोप करत नातेवाइकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात ठिय्या देत पती व सासरच्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी संजनाचा मोबाइल जप्त केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

No Comment! Be the first one.